वार्ताहर/ धामणे
धामणे व परिसरातील कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथे sदवस्की पंचाच्या उपस्थितीत रविवारी दसरा उत्सव पारंपरीक आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.
प्रतिवर्षाप्रमाणे मोठय़ा उत्साहाने होणारा दसरोत्सव यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालखी सोहळ्यात भाविकांची घट झाल्याचे दिसून आले. प्रतिवर्षी गावातून पालखी दुपारी 4 वाजता निघत होती. परंतु यंदा शासनाने दिलेले नियम पाळत येथील देवस्की पंचांनी रविवारी दुपारी 1.30 वाजता धामणे येथील मारुती मंदिरापासून पालखी सोहळ्याला सवाद्य मिरवणुकीला सुरुवात होऊन ही मिरवणूक लक्ष्मी गल्ली, शहापूर गल्ली, कलमेश्वर गल्ली येथून कुरबरहट्टी मार्गे गावापासुन तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या पडकल्लाप्पा मंदिराकडे या मिरवणुकीत येथील बाळेकुंद्री घराण्याच्यावतीने जोतिबा देवाची सासन काठी (झेंडय़ाचा) समावेश होऊन येथील मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. या मंदिर आवारात सोने लुटण्याचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर पुन्हा ही पालखी मिरवणूक गावाकडे प्रस्थान होऊन सायंकाळी सात वाजता मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीत देवस्की पंच बाबा पाटील, श्रीकांत डुकरे, महादेव चौगुले, विनोद अकणोजी, बंडू पाटील, अशोक कामशेट्टी, पारीस शहापूरी, जोतिबा धर्मुचे, बाळू बेळगावकर, वसंत बाळेकुंद्री, रामा बाळेकुंद्री, मारुती कम्मार, शिवू बडगेर, सुशील बाळेकुंद्री, शंकर बाळेकुंद्री, राजू गणाचारी आदी उपस्थित होते.