वार्ताहर/ धामणे
धामणे येथील बसवाण्णा देवाच्या मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याने गावात खळबळ माजली आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून मूर्तीवरील 4 किलो 400 ग्रॅमचे चांदीचे दागिने लंपास केले.
मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता पुजारी देवाची पूजा करण्यासाठी आले असता मंदिराच्या समोरच्या आणि गाभाऱयाच्या दरवाजाची कडी तोडून दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वडगाव ग्रामीण पोलीस अधिकाऱयांना याची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी व सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर श्वानपथकाला बोलविण्यात आले मात्र श्वानपथक मंदिराच्या उत्तर दिशेला कृषी पत्तीन सोसायटीपर्यंत जाऊन माघारी आले. यावेळी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही पाहण्यात आले. यामध्ये सोमवारी रात्री सव्वातीन वाजता सदर चोरीचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. एका मोटारसायकलीवरून तिघेजण मंदिरासमोर आले. त्यांच्यातील दोघांनी दरवाजाची कडी तोडून मंदिरात प्रवेश केला. गाभाऱयाच्या दरवाजाची कडीसुद्धा त्याच पद्धतीने तोडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवर दिसत आहे. मूर्तीवरील 72 तोळय़ाचा चांदीचा हार, 60 तोळे चांदीचे लिंग, बसवाण्णा शिंगावरील चांदीचे 32 तोळय़ाचा टोप असे एकूण 4 किलो 400 ग्रॅम चांदीचे दागिने त्यांनी लांबविले.
वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात मंदिराचे पुजारी, जीर्णोद्धार कमिटी व देवस्की पंचांच्यावतीने तक्रार नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.