क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यातील उर्वरीत लढतीसाठी संघ आणखी मजबूत करण्याच्या यत्नात ओडिशा एफसीने दोन फुटबॉलपटूंशी करार केला आहे. ओडिशाने गोव्याच्या धेंपो स्पोर्ट्स क्लबशी दिड वर्षांच्या करारावर गोलरक्षक आंतोनियो डिसिल्वाला संघात घेतले आहे.
या व्यतिरिक्त ओडिशाने जमशेदपूर एफसीचा बचावपटू करण अमीनलाही दिड वर्षांच्या करारावर संघात घेतले आहे. आंतोनियो डिसिल्वाने आपल्या युवा फुटबॉलची सुरूवात साळगावकर स्पोर्ट्स क्लबशी खेळून केली. त्यानंतर तो साळगावकरच्या 18 वर्षांखालील संघासाठी खेळला. 2017 मध्ये एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघाला खेळताना तो आय-लीगच्या दुसऱया विभागात तसेच डय़ुरँड कप व गोवा फुटबॉल संघटनेच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत खेळला. यंदाच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत तो धेंपो स्पोर्ट्स क्लबला खेळला असून 884 मिनिटे या स्पर्धेत खेळताना 9 सामन्यांतून त्याने 14 गोल अडविले आहेत.
मुंबईत जन्मलेल्या करण अमीन महिंद्रा युनायटेड, एअर इंडिया आणि मुंबईच्या वयोगटातील संघांसाठी खेळला आहे. 2014 मध्ये आय-लीगच्या दुसऱया विभागात खेळलेला करण अमीनला ट्रायल दिल्यानंतर जमशेदपूर एफसीने करारबद्ध केले. एप्रिल 2018 मध्ये तो सुपर कप स्पर्धेत मिनर्व्हा पंजाबविरूद्ध खेळला. आता तो आयएसएलमध्ये ओडिशा एफसीला खेळणार आहे. सध्या ओडिशाचे 12 सामन्यांतून 17 गुण झाले आहेत. आज त्यांची लढत वास्कोत हैदराबाद एफसी संघाशी होईल.