ट्रेंडस आणि फॅशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दिवसागणिक बदलणारे फॅशन ट्रेंडस हे फॅशनजगताच्या गतिमानतेची कल्पना देतात. सध्याच्या ट्रेंडबद्दल बोलायला गेलं तर सेलिब्रिटींमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारी फॅशन म्हणजे ‘शीर ट्रेंड‘. सर्वसामान्यांसाठी हा ट्रेंड थोडा बोल्ड असला तरी सेलिब्रिटींनी मात्र कधीच आपलासा केला आहे. शीर हे असं फॅब्रिक आहे ज्यामध्ये अत्यंत पातळ धागे वापरले जातात किंवा पारदर्शीपणे विणले जातात. फॅशन डिझायनर्सच्या मते शीर हा वत्रांचा असा प्रकार आहे जो कोणत्याही इतर वस्त्रप्रावरणांसहित खुलून दिसतो.
स्त्री देहाची सुडौल रचना शीरमुळे खुलून दिसते. शीर फॅब्रिकच्या स्कर्टमुळे तुम्हाला स्कर्टचा पारंपारिक लूक मिळतो तर शीर फॅब्रिकमुळे बोल्ड लूक मिळतो. ‘शीर‘ परिधान करताना काही पथ्यं नक्की पाळायला हवीत.
- शीर फक्त सुडौल बांध्यासाठीच नाही. शीर फॅशन सर्व प्रकारच्या बांध्यांना चालू शकते. फक्त तुमची ’शीर’ लेअर्सची पद्धत योग्य हवी.
- शीर हा फक्त कॅज्युअल वेअर नाही. हा प्रकार तुम्ही ऑफिसवेअर म्हणूनही वापरु शकता. शीर फॅब्रिकच्या टॉपसोबत कॉंट्रास्ट कोट आणि पँट तुम्हाला परफेक्ट ऑफिस लूक देईल.
- कॉम्बिनेशनकडे लक्ष द्या. शीर परिधान करताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कॉम्बिनेशन. शीरसोबत इतर फॅब्रिकचं कॉम्बिनेशन कराल तेव्हा ते योग्य असेल याकडे लक्ष द्या.
- शीर हे फक्त गाऊन आणि अंतर्गत वत्रांसाठीच योग्य आहे असं नाही. शीर हा प्रकार तुम्ही कोणत्याही वत्र प्रावरणांच्या स्वरुपात वापरु शकता.