अडीच वर्षे झाली तरीही महापालिकेचे दुर्लक्ष लॉण्ड्री व्यावसायिकांची मोठी गैरसोय
संग्राम काटकर / कोल्हापूर
बदलते जीवनमान आणि नोकरी-उद्योग-व्यवसायात आलेल्या स्पर्धेमुळे अनेकांना घरातील कामे करणे जमेनासे झाले आहे. अशातच तास दोन तास खर्च्ची घालून आपली कपडे धुणार कोण असाही नोकरदार व उद्योजकांच्या घरी प्रश्न आहे. त्यामुळे हे लोक आपली कपडे सरळ धोबींकडे देत असतात. तर दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळेही आता धोबींचेही काम कमालीचे वाढले आहे. वाढत्या कामाच्या तुलनेने कपडे धुण्यासाठी लागणाऱया छोबीघाटांची मात्र संख्या वाढलेली नाही. त्यामुळे कोल्हापूर परिट समाजाने लॉण्ड्री व्यावसायिकांसाठी पाच नव्या जागांवर अद्ययावत धोबीघाट बांधून देण्याची मागणी महापालिकेकडे लावून धरली आहे. पण अडीच वर्षे उलटली तरीही मागणीला गांभिर्याने घेतलेले नाही. त्यामुळे शहरातील लॉण्ड्री व्यावसायिकांना कपडे धुण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे.
संस्थानकाळापासून पंचगंगा नदी घाटावर सुरु असलेला आणि तत्कालिन आयुक्त द्वारकानाथ कपूर यांनी बांधून दिलेला धोबी घाट हा महापालिकेने पाणी प्रदुषणाच्या कारणावरुन बंद केला आहे. त्यामुळे बहुसंख्य लॉण्ड्री व्यावसायिकांना एक तर मंगळवार पेठेतील गंजीवली खण, रमणमळा येथील धोबी घाटाकडे अथवा इतरत्र कपडे धुण्यासाठी जावे लागते. गेल्या अडीच वर्षांपासून ही सारी करसत सुरु आहे. याची दखल घेऊन कोल्हापूर परिट समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या चारही दिशांना धोबीघाट बांधून द्यावा, अशी मागणी महापालिकेकडे लावून धरली आहे. ही मागणी करताना रंकाळा तलावाचा परताळा, मार्केटयार्ड, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, दुधाळी, शास्त्रीनगर-बुद्धगार्डन अशा पाच जागाही धोबीघाटांसाठी सुचवल्या आहेत. या घाटांवर मुबलक पाण्याची व्यवस्थाही करता येणे शक्य आहे. शिवाय पाचही जागांवर घाट बांधल्यास त्या-त्या भागातील लॉण्ड्री व्यावसायिकांना घाटांवर जाऊन लोकांची कपडे धुण्याचे काम करणे सोपे जाईल, असेही पटवून सांगितले. पण अडीच वर्षे झाली तरी महापालिकेने घाट बांधून देण्याच्या दृष्टीने हालचाली केलेल्या नाहीत. शिवाय घाट बांधून दिले जातील की नाही, हेही सांगितले नाही. त्यामुळे लॉण्ड्री व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्याच महिन्यात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंबाबाई मंदिराजवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याकडे लॉण्ड्री व्यावसायिकांसाठी पाच ठिकाणी धोबीघाट बांधून देण्याच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, अशी विनंती केली होती. त्यांनीही विनंतीला मान देत धोबीघाट बांधणीसाठी बैठक बोलावून पुढील कार्यवाही करु असा शब्द दिला आहे. तेव्हा आता त्यांनी दिलेल्या शब्दानुसार बैठक बोलावून धोबी घाट बांधणीच्या दृष्टीने पाऊले उचलावीत.
असे मत लॉण्ड्री व्यावसायिक वसंतराव वठारकर व्यक्त केले.