प्रतिनिधी/ सातारा
जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी दि. 3 मार्च रोजी संपुर्ण जगभर जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बहिरेपणाचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण लक्षात घेत समाजात जागृती करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. आपण आपल्या कानांची काळजी घेणे, बहिरेपणाचे अचूक आणि लवकर निदान करणे व ध्वनीप्रदुषणाला आळा घालणे यासारखे प्रयत्न सर्व स्तरातुन होणे गरजेचे आहे. यादिनाचे औचित्य साधुन सातारा जिल्हा रूग्णालयतर्फे ‘जागतिक कर्ण बधीर प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम’ साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सीईओ विनय गौडा, डीएचओ अनिरूध्द आठल्ये, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रकांत राजगुरू आदीसह, तसेच कान, नाक, घसा तज्ञ डॉ. ऍनमेरी, डॉ. जयश्री जगताप, अनुजा सत्ते, स्पीक इन्स्टक्टर जयश्री मगदूम उपस्थित होत्या.
या अंतर्गत महाराष्ट्रातील 11 जिल्हय़ामध्ये कर्णबधिर नियंत्रक कार्यक्रम साजरा करण्यात या अंतर्गत जनजागृती व माहिती पुस्तिकांचे वितरण देखिल सर्व सरकारी रूग्णालयांमार्फत करण्यात येते. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे जन्मजात मुलांच्यामध्ये कर्णदोषाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. याच अनुषंगाने जिल्हा व सरकारी रूग्णालयांमध्ये जन्मलेल्या सर्व नवजात बालकांची श्रवण चाचणी केली जाते.
या तपासणी अंतर्गत केवळ 5 ते 10 मिनिटांत संबंधित बालकामध्ये श्रवणदोष आहे की नाही याची माहिती मिळते. एखाद्या बालकामध्ये श्रवणदोष आढळल्यास त्यानुसार त्याच्या पुढील उपचारास सुरुवात करण्यात येते. तसेच काळजी घेण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात येते. डायग्नोस्टिक टेस्ट करण्यात येते, यानुसार किती प्रमाणात दोष आहे याचा अंदाज लागतो. त्यानुसार कमी प्रमाण असल्यास त्यांना (दारिद्रय़रेषेखालील मुलांना) महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनांतर्गत कानाचे मशीन (श्रवण यंत्र) देण्यात येते.
संभाव्यता ज्या मुलांना कर्णदोष असतो त्यांना बोलण्यात देखिल अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे या मुलांना स्पीक थेरपी देखिल घेण्यात येते. यामध्ये या मुलांना बोलायला शिकविण्यात येते. त्याचबरोबर एखाद्या मुलामध्ये कर्ण दोषाचे प्रमाण 90 ते 100 टक्के असल्यास त्या संबंधित बालकाची टॉकलेर इंप्यॅक्ट ऑपरेशन करावे लागते. हे ऑपरेशन करण्यास जवळपास 7 ते 8 लाख इतका खर्च लागतो. पण जिल्हा रूग्णालयांतर्गत मोफत हे ऑपरेशन मिरज येथील रूग्णालयात करण्यात येते. त्यानंतर जवळपास 2 वर्ष स्पीक थेरपी करण्यात येते. ही थेरपी प्रत्येक आठवडय़ातुन दोन वेळा नियमितपणे तज्ञांकडून करण्यात येते.
कोरोनामुळे ऑपरेशन करण्यास विलंब
जिल्हा रुग्णालयांतर्गत आजवर 645 जणांना श्रवणयंत्रे दिली आहेत. यापैकी 76 श्रवणयंत्रे ही मागील वर्षी देण्यात आली आहेत. तसेच सन 2018 पासून 90 ते 100 टक्के श्रवणदोष असलेल्या बालकांचे टॉकलेर इंप्यॅक्ट (ऑपरेशन) करण्यात आले आहेत. यापैकी 2018 साली 4, 2019-20 मध्ये 20 जणांचे ऑपरेशन करण्यात आले आहेत. तसेच 2021-22 अंतर्गत 9 जणांचे ऑपरेशन करण्यात येणार आहेत. सध्या कोरोनामुळे हे ऑपरेशन करण्यास विलंब झाला आहे.
श्रवणदोष झाल्यास लवकर उपचार घ्या
एखाद्या बालकांमध्ये श्रवणदोष असल्यास लवकरात लवकर योग्य ते उपचार केल्यास या दोषाचे निवारण होऊ शकते. कानासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास हलगर्जीपणा करू नये. तज्ञांकडून त्वरीत सल्ला घ्यावा. जितक्या लवकर उपचार घ्याला तितकाच चांगला परिणाम दिसुन येतो. भाषा आणि वाचा विकास होण्यास देखिल मदत होते.
डॉ. जयश्री जगताप
ऑडीओलॉजिस्ट