ऑनलाईन टीम / मुंबई :
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेता मयुरेश कोटकरला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता मयुरेश कोटकर याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली. शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी श्रीनगर पोलिसात यासंदर्भात तक्रार दिली. तक्रारीनंतर कोटकर याला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी ही पोस्ट फेसबुकवरुन हटवली. कोटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
कोटकर यांने इतरांप्रमाणेच नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याने यासंदर्भात अनेक पोस्ट केल्या होत्या. त्यामधील एका आक्षेपार्ह पोस्टवरुन त्याला अटक करण्यात आली.