शिवसेना- मनसे आक्रमक: देवगड तहसीलदार, पोलिसांना निवेदनः कारवाईची केली मागणी
प्रतिनिधी / देवगड:
देवगड- जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने यांचा वाढदिवस देवगड शहरातील एका हॉटेलमध्ये काही नगरसेवकांसमवेत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोरोना संक्रमणात माक्स न वापरता व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता हा वाढदिवस साजरा केल्याचे उघड झाले. त्यामुळे याविरोधात शिवसेना व मनसेने टीकेची झोड उठविली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड पोलीस निरीक्षकांना तक्रार देऊन नगराध्यक्ष व संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
देवगड- जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी जामसंडे बाजारपेठ बंद ठेवली आहे. असे असताना नगराध्यक्षा सौ. माने यांचा वाढदिवस विद्यमान 13 नगरसेवक व अन्य तीन व्यक्तींच्या उपस्थितीत देवगड शहरातील एका हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नगराध्यक्षांसह एकानेही मास्क वापरलेला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगही नव्हते. कोरोना संक्रमणामध्ये नागरिकांना काळजी घेण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम सांगितले जात आहेत. तसेच मास्क न वापरणाऱयांवर 200 रूपये दंड आकारण्यात येत आहे. मात्र शासनाच्या नियमांची लोकप्रतिनिधीच पायमल्ली करीत असल्याची टीका सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या फोटोसह केली जात आहे. याबाबत देवगड तालुका मनसेचे अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनीही याविरोधात देवगड तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.
नगराध्यक्षा, नगरसेवकांना नियमांचा विसर
मेस्त्री यांनी म्हटले आहे, नगराध्यक्षांचा वाढदिवस साजरा करून नगरसेवकांनी लॉकडाऊन नियमांची ऐशी- तैशी केली आहे. एकाही लोकप्रतिनिधीने माक्स व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलेले नाहीत. मास्क न लावणाऱया सामान्य नागरिकांकडून नगरपंचायत प्रशासन दंड वसूल करीत असते. आता नगराध्यक्षांच्या वाढदिवस पार्टीत उपस्थित राहिलेल्या विद्यमान नगरसेवक व इतर व्यक्तींकडून नगरपंचायत प्रशासन दंड वसूल करणार का? कोरोना रोखण्यासाठी घंटागाडीद्वारे जनतेला नियम व सूचना सांगणाऱया नगराध्यक्ष व नगरसेवकांना नियमांचा विसर पडला का? देवगड व जामसंडेमध्ये कोरोना रूग्ण आढळत असताना नगरसेवक वाढदिवस कसा साजरा करू शकतात? अशा प्रश्नांचा भडिमार करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मेस्त्री यांनी केली आहे.
सत्ताधारी मनमानी कारभारात मग्न
शिवसेना तालुकाप्रमुख साळसकर यांनी देवगड सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, देवगड- जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये जामसंडे बाजारपेठ येथे कोविड रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाजारपेठ पूर्ण बंद करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये नगरपंचायतीमार्फत कुठलाही सत्ताधारी नगरसेवक किंवा नगरपंचायत प्रशासन कुठेही दिसून आलेले नाही. स्थानिक व्यापारी व पोलीस यंत्रणेने विचार-विनिमय करून सामंज्यसपणाने मार्ग काढला. सध्या शहरामध्ये कोविडचे रुग्ण आढळत असून सत्ताधारी हे आपल्याच मनमानी कारभारामध्ये मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नगराध्यक्ष, नगरसेवकांकडून नियमांची ऐशी-तैशी
नगराध्यक्षा व काही नगरसेवकांनी देवगडमधील एका नामांकित हॉटेलमध्ये थाटामाटात नगराध्यक्षांचा वाढदिवस साजरा केला. देवगड, जामसंडे शहरामध्ये सर्वसामान्य जनतेला नगरपंचायतीने फर्मान काढले की शहरामध्ये कुठलाही नागरिक विनामास्क आढळून आल्यास 200 रू. दंडात्मक कारवाई करण्यात येईल. काही नागरिकांकडून न. पं. ने 200 रू. ची दंडात्मक वसुलीही केली. नगराध्यक्षा व नगरसेवकांनी नियमांची ऐशी-तैशी करून ‘ना मास्क, ना सोशल डिस्टन्स’ने वाढदिवस साजरा केला, असेही साळसकर यांनी म्हटले आहे.
संबंधितांवर गुन्हे दाखल करा!
ज्याठिकाणी वाढदिवस साजरा केला, त्याठिकाणी नगराध्यक्षांसह काही नगरसेवक मिळून 16 जण उपस्थित होते. त्याठिकाणी वस्तुस्थिती पाहता नगराध्यक्षांनी कायद्याचे स्वतःच उल्लंघन केल्याचे दिसून येते. त्यामुळे नगराध्यक्षा व संबंधित नगरसेवक देवगड- जामसंडे नगरपंचायतीमध्ये प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 3200 रू. ची दंडात्मक रक्कम जमा करतील का? शहरामध्ये कोविड रुग्ण आढळून येत असल्याने अशा प्रकारचे वाढदिवस साजरे करणे व कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा असून प्रशासनाने संबंधितांवर ‘कोविड- 19’ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी साळसकर यांनी केली आहे.
जुने फोटो व्हायरल! हा राजकीय स्टंट- नगराध्यक्षा
आपल्या वाढदिवसाचे जे फोटो व्हायरल केले जात आहेत ते जुने फोटो आहेत. मोबाईलच्या हॉटस्अप स्टेटसवरून ते फोटो घेऊन व्हायरल केले जात आहेत. हे राजकीय विरोधकांकडून आपल्याला व नगरपंचायतीला बदनाम करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. जर यासंदर्भात विरोधकांकडे याचे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत. जुने फोटो व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी आपण याबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने यांनी दिली.