नगरपालिका पदाधिकारी निवडणूक 2 नोव्हेंबरपूर्वी घ्या
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील 59 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने गत आठवडय़ात स्थगिती दिली होती. मात्र, ही स्थगिती उठवत याचिका दाखल झालेली ठिकाणे वगळता, अन्य नगरपालिकांमध्ये पदाधिकारी निवडणूक 2 नोव्हेंबरपूर्वी घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ातील नगरपालिकांमधील पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने 8 ऑक्टोबर रोजी नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. मात्र, या आरक्षणाविरोधात हासन, हरिहर, कोप्पळ येथील काहींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
त्यामुळे उच्च न्यायालयाने गत आठवडय़ात आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या अधिसूचनेलाच स्थगिती दिली होती. परिणामी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका जाहीर होऊनही त्या लांबणीवर टाकण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यानंतर होणाऱया सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
त्यानुसार बुधवारी उच्च न्यायालयाने हासन, अरसिकेरे, हरिहर, कोप्पळ आणि शिडलघट्ट येथील पदाधिकारी निवडणूक वगळता राज्यातील उर्वरित पालिकांची पदाधिकारी निवडणूक 2 नोव्हेंबरपूर्वी घेण्यात यावी, असा आदेश राज्य सरकारला दिला आहे. तसेच सदर 5 पालिकांच्या पदाधिकारी निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बेळगाव जिल्हय़ातील निपाणी व गोकाक नगरपालिकांमधील पदाधिकारी निवडणूक वेळापत्रक येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
राजकीय हालचालींना वेग
उच्च न्यायालयाने बुधवारी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याची बातमी समजताच, निपाणीत थंडावलेल्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. एक-दोन दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन साधारणपणे 31 ऑक्टोबर अथवा 2 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षöउपनगराध्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपासूनच इच्छुकांकडून बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जुळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.