उच्च न्यायालयाचा आदेश : जिल्हय़ातील पदाधिकारी निवडीला ब्रेक
प्रतिनिधी / निपाणी
गेल्या आठवडय़ात नगर पालिका पदाधिकारी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता नगर परिषद व नगर पंचायतीच्या आरक्षणालाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सोमवारी दुपारी हा आदेश देण्यात आला आहे. त्याचा आधार घेत मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱयांनी बेळगाव जिल्हय़ात होणाऱया नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमालाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे नगर पालिकेपाठोपाठ नगर परिषद व नगर पंचायतीची पदाधिकारी निवडणूकही पुन्हा न्यायालयात गेली आहे.
राज्य सरकारने 8 ऑक्टोबर रोजी राज्यातील 59 नगर पालिका, 117 नगर परिषद व 100 नगर पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर केले होते. मात्र हासन जिल्हय़ातील अरसीगेरे नगर पालिकेच्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारच्या नगर पालिका पदाधिकारी आरक्षणाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्हय़ातील निपाणी व गोकाक येथील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यानंतर नगर परिषद व नगर पंचायत पदाधिकारी निवडणुकीचे काय होणार, याबाबत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ातील बागेपल्ली व दावणगेरी जिल्हय़ातील चन्नगेरी नगर परिषद तसेच कोडगू जिल्हय़ातील सोमवारपेठे या नगर पंचायतीसह विविध ठिकाणच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारच्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या आरक्षण अधिसूचनेला सोमवारी दुपारी स्थगिती दिली. त्यामुळे जिल्हय़ातील संकेश्वर, हुक्केरी, सदलगा, कुडची, अथणी, सौंदत्ती, उगारखुर्द, हारुगेरी आदी नगर परिषदा तसेच रायबाग, एकसंबा, बोरगाव व चिंचली नगर पंचायतीच्या पदाधिकारी निवडणूक कार्यक्रमालाही स्थगिती मिळाली आहे. तसा आदेश जिल्हाधिकाऱयांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित मुख्याधिकाऱयांना दिला आहे.
आज सुनावणीची शक्यता
उच्च न्यायालयाने सदर आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात बुधवारी पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच नगर पालिका आरक्षणासंदर्भातही गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. नगर परिषद व नगर पंचायतीच्या आरक्षणाला सोमवारी दुपारी न्यायालयीन स्थगिती मिळाली. मात्र तत्पूर्वीच सोमवारी सकाळी चिकोडीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. त्यामुळे या निवडीला सध्या तरी कोणता आक्षेप नाही.