सेन्सेक्स 125 तर निफ्टी 44 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात अंतिम दिवशी शुक्रवारी समभागांच्या उच्चांकी मूल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात नफा वसुली केली या कारणास्तव बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 125 अंकांच्या घसरणीसोबत बंद झाला आहे. प्रारंभीच्या दरम्यान ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 59,737 चा उच्चांक प्राप्त केला होता.
दिग्गज कंपन्यांमध्ये कोटक महिंद्राचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबत भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, ऍक्सिस बँक आणि नेस्ले इंडिया यांचे प्रमुख समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांपैकी टाटा स्टील, स्टेट बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
दिवसभराच्या कामगिरीदरम्यान प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समध्ये 866 अंकांवर चढउतार राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये दिवसअखेर 125.27 अंकांसोबत 0.21 टक्क्यांची घसरण राहिली असून निर्देशांक 59,015.89 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 44.35 अंकांसोबत 0.25 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,585.15 वर बंद झाला आहे.
जागतिक बाजारांमध्ये आशियातील शांघाय, टोकीओ, सिओल आणि हाँगकाँग हे लाभात राहिले होते. तर युरोपमधील प्रमुख बाजार हे दुपारपर्यंतच तेजीत राहिल्याचा कल होता.
जीएसटी परिषदेचा प्रभाव
आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषद आयोजित करण्यात आल्यामुळे सदरच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याचे दिसून आले असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले. अन्य घडामोडींमध्ये लसीकरणाने पकडलेली तेजी आणि निर्यातीच्या आकडय़ांमध्ये आलेल्या सकारात्मक वातावरणामुळे बाजाराने 60,000च्या जवळपास टप्पा प्राप्त केला, नफा वसुलीच्या स्थितीमुळे सेन्सेक्स व निफ्टी यांना आपली तेजी कायम ठेवण्यात अपयश आल्याचे दिसून आले आहे.