वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी भारताचे नरिंदर बात्रा यांची दुसऱयांदा निवड झाली आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नरिंदर बात्रा यांनी आपले प्रतिस्पर्धी बेल्जियमचे मार्क कोड्रॉन यांचा पराभव केला.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 47 व्या झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. या मतदानात बात्रा यांनी कोड्रॉन यांचा दोन मतांनी पराभव केला. बात्रा यांना 63 तर कोड्रॉन यांना 61 मते मिळाली. सदर मतदानाची प्रक्रिया ऑनलाईनद्वारे आयोजित केली होती. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 124 सदस्यांनी आपले मतदान केले. 2016 साली बात्रा यांची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा निवड झाली होती. आता ते दुसऱयांदा हे पद भूषवित आहेत.