राज्य सरकारकडून मार्गसूची जारी : बार, रेस्टॉरंटमध्ये पाटर्य़ा, कार्यक्रमांवर बंदी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने नववर्षानिमित्त होणाऱया कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्याकरिता स्वतंत्र मार्गसूची जारी करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिकपणे किंवा समुहाने नववर्ष साजरे करता येणार नाही. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
यंदा बार, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये नववर्षानिमित्त पाटर्य़ांचे आयोजन करता येणार नाही. साधेपणाने कार्यक्रमाचे आयोजन करावे लागणार आहे. कार्यक्रमामध्ये 200 पेक्षा कमी जणांना उपस्थित राहता येईल. त्याकरिता ऑनलाईन पास मिळवावा लागेल. त्याचबेराबर नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
पब आणि क्लबमध्ये क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक जणांना प्रवेश देता येणार नाही. तेथे नृत्य, डीजेवर बंदी घातली आहे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱया कार्यक्रमांमध्ये कोविड मार्गसूचीचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.
घरामध्ये कुटुंबांसमवेत नववर्ष साजरे करण्यावर निर्बंध नाहीत. मात्र, घरासमोर किंवा छतावर मंडप उभे करून तेथे मोठय़ा प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. सरकारने मंगळवारी जारी केलेल्या मार्गसूचीचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कर्नाटक संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 2020 आणि आपत्ती नियंत्रण कायदा 2005 नुसार भा. दं. वि. 188 अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. बेंगळूरमध्ये एम. जी. रोड, चर्चस्ट्रीट, कोरमंगल व इतर ठिकाणी सार्वजनिकरित्या नववर्ष साजरे करण्यावर निर्बंध घातले आहेत. याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी बेंगळूर महापालिकेकडून यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याची दखल घेण्यात आली आहे.