30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत नवे नियम : बार-रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के जणांनाच प्रवेश
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका विचारात घेऊन राज्य सरकारने नववर्षाच्या निमित्ताने होणाऱया जल्लोषावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नववर्ष सार्वजनिकपणे साजरे करता येणार नाही. मात्र, ख्रिसमस साजरा करण्यावर कठोर निर्बंध असणार नाहीत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये मंगळवारी पार पडलेल्या उच्चस्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण, राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार व इतर अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोम्माई यांनी राज्यात 30 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत नवी मार्गसूची लागू असणार आहे. या कालावधीत नववर्षानिमित्त सार्वजनिक कार्यक्रम, मनोरंजनपर कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, डान्स-पाटर्य़ांचे आयोजन करण्यास निर्बंध असणार आहे. त्याचप्रमाणे बार-रेस्टॉरंट व इतर ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांना प्रवेश असणार आहे. येथील कर्मचाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावे, असे सांगितले.
बेंगळूरमध्येही नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मोठय़ा प्रमाणात गर्दी करते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेड रोड, एम. जी. रोड या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात होणाऱया नववर्ष स्वागत कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, ख्रिसमस साजरा करण्यावर कोणतेही कठोर निर्बंध असणार नाहीत. मात्र, ख्रिसमसनिमित्त पाटर्य़ांचे आयोजन करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
मार्गसूचीचे पालन करा
चर्चमध्ये कोविड मार्गसूचीचे पालन करून प्रार्थनेत सहभागी व्हावे, अशी माहितीही बोम्माई यांनी दिली. नववर्षानिमित्त बार, पबमध्ये पार्टी, डान्स कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. अपार्टमेंट किंवा नागरी वसाहतींमध्ये साऊंड सिस्टीम लावून गटागटाने कार्यक्रम आयोजिण्यावर निर्बंध आहेत.