वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
बिस्कीटांसह विविध उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांच्या पसंतीची कंपनी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटानियाची ओळख आहे. शहरापासून ग्रामीण भागातील ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या या कंपनीकडून ब्रेड, बिस्किट यासारख्या उत्पादनांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती असून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनी येत्या काळात नवीन 5 कारखान्यांमध्ये गुंतवणूक करण्याच् ाा अंदाज आहे.
येत्या अडीच वर्षाच्या कालावधीत 5 नवीन कारखान्यांची उभारणी करण्यासाठी 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक वरुण बेरी यांनी दिली आहे. देशातील विविध भागात उभारण्यात येणाऱया कारखान्यांसाठी ही गुंतवणूक होणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी दिले आहे.
एप्रिल ते जून तिमाहीत कंपनीच्या उत्पादनांची मागणी सर्वाधिक तेजीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणी तीन नवीन प्रकल्प सुरू करायचे आहेत, असे समजते. तसेच वाडिया समूहातील कंपनीच्या माहितीनुसार आपल्या ओडिसा आणि महाराष्ट्रमधील कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवतानाच नवीन दोन प्रकल्प उभारण्याचीही तयारी चालली असल्याचे समजते.