राज्यात शुक्रवारी 4,991 जणांना कोरोना : 1,631 जण संसर्गमुक्त
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून सक्रिय रुग्णसंख्येत कर्नाटक देशात दुसऱया स्थानावर पोहोचला आहे. तर दिवसभरातील एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण 4.19 टक्के इतके आहे. राज्यात शुक्रवारी 4,991 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवसभरात नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 5 हजाराच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 4,991 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर केवळ 1,631 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण कमी असले तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. शुक्रवारी राज्यात 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ातील 5 तर गुलबर्गा जिल्हय़ातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांमध्ये 1,18,933 जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 2,16,45,891 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मंत्र्यांना घरात लस : वैद्यकीय अधिकारी निलंबित
कृषीमंत्री बी. सी. पाटील यांना त्यांच्या घरात जाऊन डॉक्टरांनी कोरोना प्रतिबंधक लस दिल्याप्रकरणी हिरेकेरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. झेड. आर. मकानदार यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य खात्याचे आयुक्त के. व्ही. त्रिलोकचंद्र यांनी निलंबनाचा आदेश दिला आहे. 2 मार्च रोजी हिरेकेरुर तालुका आरोग्याधिकारी डॉ. झेड. आर. मकानदार यांनी कृषीमंत्री बी. सी. पाटील यांच्या घरी जाऊन त्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली होती. हा प्रकार सरकारच्या मार्गसूचीचे उल्लंघन ठरणारा असल्याने याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मंत्री बी. सी. पाटील यांच्याविरोधातही राज्यभरातून व्यापक टीका झाली होती.