ऑनलाईन टीम / नांदेड :
सध्या देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने फोफावत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी कोरोनाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच होळी सणाच्या निमित्ताने राज्यात कोरोना पसरू नये म्हणून कोरोना नियम पाळून होळी साजरी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी होळी सणाच्या निमित्ताने हरताळ फासला गेला आहे. तर नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केली असताना, अनेकांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवले आहे.
त्यातच सोमवारी नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्ड पदाधिकार्यासह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाजीराबाद पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आता व्हिडीओच्या साह्याने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात 60 जण आरोपी असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. या सर्व घटनेनंतर नांदेडमध्ये शांतता पसरली आहे.
- नेमके प्रकरण काय आहे?
नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरीही नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या मिरवणुकीत कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच परिसरातील गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.