वार्ताहर/ जैतापूर
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना रात्रीच्यावेळी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱया टोळक्याला नाटे पोलिसांनी धडक कारवाई करत जेरबंद केले. या टोळक्यात राजापूरसह लांजा, पूर्णगड येथील सातजणाचा समावेश आहे. शनिवारी रात्री 12.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी नाटे पोलिसांनी संदीप हळदणकर (कशेळी), विक्रम पोकडे, नीलेश पोकडे, स्वरूप तोडणकर, किरण पोकडे, प्रकाश पोकडे (सर्व रा. डोर्ले, रत्नागिरी), राजेश तरळ (हर्चे, लांजा) अशा सातजणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटे पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव, प्रसाद शिवलकर, कॉन्स्टेबल कदम हे शनिवारी रात्र गस्तीवर फिरत असताना मध्यरात्री 12.30 च्या सुमारास राजापूर तालुक्यातील तिवरे फाटय़ावर एक सेवरेलो गाडी संशयास्पदरित्या फिरताना आढळली. त्यामुळे पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता गाडीत शिकारीसाठी लागणारे साहित्य व बंदूक आढळून आली. पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच या कारवाईत पोलिसांनी सिंगल बॅरल बंदूक, 3 जिवंत काडतुसे, सर्चलाईट आणि शेवरोलेट एन्जॉय गाडी असे साहित्य जप्त केले. तसेच सातही आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3 (1), 25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.