राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाला सूचना : विधानसभा उमेदवारी अर्ज भरणा ऑनलाईन
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज करण्यास मिळणार असल्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेतून समोर आली असून नाताळ, नवीन वर्ष साजरे झाल्यानंतरच निवडणूक तारीख घोषित करण्यात यावी अशी सूचना राजकीय प्रतिनिधींनी आयोगाला केली आहे.
सार्वजनिक सुटी, धार्मिक सण, उत्सवाच्या दिवशी मतदान नको असेही आयोगाला सांगण्यात आले आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर नको आणि आयोगाने तो टाळावा, अशी मागणी विरोधी पक्ष प्रतिनिधींनी आयोगाकडे केली असून सरकारी नोकरभरतीचा विषय देखील आयोगापुढे मांडण्यात आल्याची माहिती राजकीय पक्षांनी दिली.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा व इतर दोन आयुक्त राजीव कुमार, अनुप पांडे आणि आयोगाचे इतर अधिकारी यांनी राज्यातील विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. मगो, भाजप, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व इतर राजकीय पक्षांचे नेते आयोगाच्या बैठकीत सहभागी झाले होते. सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे म्हणणे आयोगासमोर मांडले आणि ते आयुक्तांनी ऐकून घेतले. निवडणूक खर्च, त्याचे निरीक्षक व इतर विषयांवर बैठकीत चर्चा झाली. निवडणुकीशी संबंधित विविध खात्यांचे प्रमुख तसेच नोडल अधिकारी आयोगाने बातचित केली. मतदार यादी त्यांची उजळणी व इतर गोष्टींचा आयोगाने आढावा घेतला आणि ते पथक बुधवारी आणखी एक बैठक करुन माघारी परतणार आहे.
बुधवारी मुख्य सचिव परिमल राय, वित्त सचिव पुनितकुमार गोयल, पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला तसेच दोन्ही जिल्हाधिकारी यांच्याशी आयोगाची बैठक होणार असून त्यात निवडणुकीच्या एकंदरित तयारीची मिमांसा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.