प्रतिनिधी /वास्को
सांकवाळ येथील आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या वास्कोतील ईस्माईल शेख उर्फ कब्बू (32) व खलील शेख(24) यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने त्यांच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या त्या घटनेला आज मंगळवारी अकरा दिवस पूर्ण होत असून या घटनेनंतर फरार झालेले दोघेही संशयीत अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. हल्ला करून पसार होतांना ईस्माईल शेख याचा मोबाईल फोन घटना स्थळी सापडल्याने हल्ल्याचे षडयंत्र उघडकीस आले हेते. या फोनच्या आधारेच झुआरीनगरातील राम गोपाल यादव उर्फ करीय्या हा पोलिसांच्या तावडीत सापडला होता. नारायण नाईक यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यानेच ईस्माईल शेख व खलील शेख यांना सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. ईस्माईल हा बायणातील तर खलील हा फकीर गल्ली वास्को या भागातील असून दोघेही कुप्रसिध्द आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने गुन्हा अन्वेषण विभागाने या दोघांविरूध्द लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
नारायण नाईक यांनी कोमुनिदाद जमीनीवरील अतिक्रमणे तसेच अन्य बेकायदा प्रकरणाविरूध्द तक्रारी करून या प्रकरणांचा पाठपुरावाही जारी ठेवला होता. त्यामुळे त्यांच्यावर काहींचा रोष होता. या तक्रारींचा वचपा काढण्यासाठीच करीय्याच्या माध्यमातून कोणीतरी नारायण नाईक यांच्यावर हल्ला करण्यासाठी ईस्माईल व खलील यांना सुपारी दिलेली असल्याचा संशय पोलिसांना असून सांकवाळचे पंच व नारायण नाईक यांचे बंधु तुळशिदास नाईक यांनी सांकवाळ पंचायत मंडळाकडे या प्रकरणात संशयीत म्हणून बोट दाखवलेले आहे. दोघेही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागल्यावरच या प्रकरणावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहे.