दुचाकीवरून पडलेल्या दाम्पत्याची चौकशी करूनच पुढील कार्यक्रमास रवाना!
वार्ताहर/ औंध
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या कर्तव्यदक्षतेचे,माणुसकीचे दर्शन रविवारी खटाव तालुक्यातील जनतेला मिळाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ना.बाळासाहेब पाटील हे माण तालुक्यातील मार्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना खटाव तालुक्यातील वडी-त्रिमलीजवळ नवीन काम झालेल्या रस्त्यावरून दुचाकी घसरून एका लहान मुलासह दाम्पत्य खाली पडलेले त्यांना दिसले,त्यांनी तात्काळ वाहनांचा ताफा थांबवुन अपघातस्थळी धाव घेतली, त्या दाम्पत्याबरोबर एक लहान मुल होते,त्यामुळे त्यांनी मुलासह दाम्पत्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली,कोणाला काही दुखापत झाली आहे का याची देखील आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील हे पुढच्या प्रवासाकडे रवाना झाले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार,संजय थोरात,औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांचेसह अधिकारी,कर्मचारी,कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.