रोख 6 हजार रुपयांसह साहित्याची चोरी : संशयित चोरटा ताब्यात : चोरीच्या घटना वाढल्याने व्यापाऱयांत भीती
प्रतिनिधी / निपाणी
निपाणी बसस्थानक परिसरातील 5 दुकाने फोडल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडल्याचे उघडकीस आले. चोरटय़ाने रोख 6 हजार रुपये लांबविले तर सुमारे 30 हजार रुपयांचे साहित्यही चोरून नेले. चोरीच्या घटनेनंतर काही वेळातच संशयित चोरटय़ास ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दशरथ सिद्राम बागडे (वय 20, रा. आश्रयनगर, निपाणी) असे संशयित चोरटय़ाचे नाव आहे.
घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, बसस्थानक परिसरातील ओढय़ानजिकच्या वडगावे ऍग्रो, नेट फ्रिडम, विजय हेअर ड्रेसर, फ्रीडम शिफ्ट व डॉ. एम. आय. भोस्की यांच्या दवाखान्यासह असलेली 5 दुकाने संशयिताने फोडली. यामध्ये सुमारे रोख 6 हजार रुपयांची रक्कम लांबवली आहे. प्रमुख वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागातच ही घटना मंगळवारी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घडली. गत दोन-तीन महिन्यांपासून निपाणी परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांसमोरही तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, घटनेतील चोरटा हा सीसीटीव्हीमध्ये आढळून आल्याने पोलिसांनी तपास चालविला असता हॉटेल न्यू आरामनजीक संशयित दशरथ बागडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली. पुढील तपास शहर फौजदार अनिलकुमार कुंभार हे करत आहेत.