मार्चअखेरपर्यंत 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट, 50 टक्के जमा
प्रतिनिधी /बेळगाव
मार्चअखेरपर्यंत 100 टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. आतापर्यंत 71 हजार 450 मालमत्ताधारकांनी 43 कोटी 20 लाख 11 हजार रुपये घरपट्टी जमा केली आहे. 69 हजार 137 मालमत्ताधारकांनी अद्याप घरपट्टी जमा केली नाही. त्यामुळे केवळ 50 टक्के मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली असून, उर्वरित मालमत्ताधारकांची घरपट्टी थकली आहे.
2021-22 या आर्थिक वर्षात 50 कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते. महापालिका व्याप्तीत 1 लाख 40 हजार 587 मालमत्ता असून, यापैकी 50 टक्के मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली आहे. त्यामुळे 43 कोटी 20 लाख 11 हजार रुपये महापालिकेच्या खजिन्यात जमा झाले आहेत. उर्वरित घरपट्टी जमा करून 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केवळ 6 दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. 6 दिवसात 7 कोटी 80 लाखाची वसुली होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दरवषी बहुतांश मालमत्ताधारक घरपट्टी जमा करतात. मात्र यंदाची आकडेवारी पाहता निम्म्या मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली आहे. तर निम्म्या मालमत्ताधारकांकडे घरपट्टी थकली आहे.
घरपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून मार्च महिन्यात वसुली मोहीम राबविण्यात येते. घरोघरी जाऊन थकबाकीदारांना चलन देण्यात येते. मात्र यंदा महसूल विभागातील महसूल निरीक्षक आणि कर्मचाऱयांकडे पदवीधर मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारच्या सर्वेक्षणाची कामे लावण्यात आल्याने घरपट्टी वसुलीचे आणि चलन देण्याची मोहीम ठप्प झाली आहे. त्यामुळेच निम्म्या मालमत्ताधारकांचे घरपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
भरणाऱयांना पाच टक्के सूट
घरपोच चलन मिळत असल्याने मालमत्ताधारकांना घरपट्टी भरणे सोपे जात होते. घरी चालन देण्यात आल्याने घरपट्टी किती भरावी लागणार याचा अंदाज मालमत्ताधारकांना येत होता. त्यानुसार रक्कम जमा करून भरणे सोयीस्कर जात होते. पण चलन घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे घरपट्टी वसुलीवर परिणाम होत आहे. घरपट्टी भरण्यासाठी 6 दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱयांवर सोपविण्यात आलेल्या विविध जबाबदाऱयांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एप्रिल महिन्यात 2022-23 ची घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येते. तर थकबाकीदारांना प्रति महिना 2 टक्के दंड व्याज भरावा लागतो.