वार्ताहर / राजापूर
राजापूरचे प्रांताधिकारी यांच्यावर झालेली कारवाई सध्या प्रशासनासह तालुकावासीयांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लांजातील डंपींग ग्राऊंड प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून तसेच एका राजकीय पक्षाच्या मंत्र्याचा दबाव असतानाही त्याला बळी न पडता खाडे यांनी नियमानुसार भूसंपादन प्रक्रिया राबविली. त्यामुळे खाडे यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा लांजा व राजापूरात जोरदारपणे सुरू आहे.
दि.1 मार्च 2019 पासून विभागीय अधिकारी राजापूर या पदावर कार्यरत असलेले प्रांताधिकारी प्रविण खाडे यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, वरिष्ठांचे फोन न उचलणे, अधिनस्त कर्मचारी यांच्याशी पूर्वग्रहदूषित ठेउढन काम करण्याची प्रवृत्ती, कार्यालयीन तपासणीच्या वेळी अभिलेख उपलब्ध करून न देणे असा ठपका ठेवून त्यांची राजापूरातून बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खाडे यांच्यावर अचानक अशी कारवाई झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. खाडे यांच्यावर झालेल्या कारवाईमागे लांजातील डंपिग ग्राऊंड प्रकरण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
लांजा नगर पंचायत डंपींग ग्राऊंडसाठीच्या जागा खरेदी प्रकरणात खाडे यांनी कठोर भूमिका घेत पुर्वीचा नियमबाहय़ प्रस्ताव बाजूला सारून नव्याने जागा खरेदीसाठी निवीदा प्रक्रिया राबविली होती. मात्र यावरून जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱयासह एक मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकाने खाडे डंपींग ग्राऊंडच्या जागेसाठी पुर्वीचाच प्रस्ताव मार्गी लावाला यासाठी खाडे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. तरीही खाडे यांनी नियमाप्रमाणे प्रक्रिया राबविल्याने त्यांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांकडून नाहक त्रास देण्यात येत होता, अशीही चर्चा आहे.
दरम्यान गेल्या चार महिन्यात तीन वेळा राजापूर प्रांताधिकारी कार्यालाचे ऑडिट करण्यात आल्याची चर्चा प्रांताधिकारी कार्यालयात सुरू आहे. मात्र त्यातही काहींच हाती लागले नाही. अखेर खाडे यांच्या विरोधात काही महिन्यांपुर्वी प्रांताधिकारी कार्यालयातील एका महिला कर्मचाऱयाने केलेल्या तक्रारीचे प्रकरण पुढे करून त्यांच्यावर अधिकारी व कर्मचाऱयांना नाहक त्रास देत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या कारवाईबाबत महसूल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये नाराजीचा सुरू असून प्रशासन राजकीय दबावाखाली काम करते की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.