वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयातील निलावडे येथे भर दुपारी कुलूप बंद असलेल्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून तिजोरीतील अडीच तोळय़ाचे गंठण लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारच्या दरम्यान घडली. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, निलावडे ग्राम पंचायत व बाजूला असलेल्या मंदिराच्या बाजूला ग्राम पंचायतीचे वॉटरमन कृष्णा दळवी यांचे घर आहे. शनिवारी सुट्टी असल्याने कृष्णा दळवीसह त्यांच्या घरातील मंडळी घराला कुलूप लावून शेताकडे गेली होती. घर कुलूपबंद असल्याचे पाहून दुपारी एकच्या दरम्यान चोरटय़ांनी घरच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तिजोरीत असलेल्या अडीच तोळय़ाचे गंठण चोरटय़ांनी लंपास केले. सदर कृष्णा दळवी यांची बहीण मुंबई येथे राहते. तिने आपल्या भावाकडे घरी सुरक्षिततेसाठी आपले गंठण ठेवले होते. पण चोरटय़ाने त्याच्यावरही डाव साधला. पाठीमागील दरवाजाने घरात शिरून तिजोरीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पसरून त्यामध्ये असलेले गंठण चोरटय़ाने लांबविले आहे. सायंकाळी 7 वाजता शेताकडून घरी येऊन त्यांच्या परिवाराने पाहिले असता चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने खानापूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.