राज्य निवडणूक आयुक्त डॉ. बी. बसवराजू यांची अधिकाऱयांना सूचना, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : निवडणुकीबाबत कर्मचाऱयांना प्रशिक्षण
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त डॉ. बी. बसवराजू यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेतली. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. पारदर्शक, मुक्त वातावरणात, निपक्षपणे निवडणूक घेण्याची सक्त ताकीद अधिकाऱयांना केली.
निवडणूक निरीक्षक तसेच खर्चाच्या नियोजन निरीक्षकांनी आणि नोडल अधिकाऱयांनी सावधगिरीने पावले टाकावीत. उमेदवारांना नियमांची जाणीव करुन द्यावी. त्यांच्या मनामध्ये असलेला गोंधळ दूर करावा. निवडणुकीदरम्यान होणाऱया प्रचारावर लक्ष ठेवावे. जाहीर प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. केवळ घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेव्हा त्यावर लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या नियमांचे सर्व प्रकारे पालन करावे. तत्त्वांच्या आधारेच ही निवडणूक झाली पाहिजे. पोलीस विभागानेही गांभीर्याने लक्ष द्यावे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहू नये याची सावधानता बाळगावी. आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये यासाठी नियोजन करुन निवडणूक प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले.
निवडणूक काळात मतदारांना आमिषे दाखविले जातात. दारूचा पुरवठा देखील केला जातो. पैशाचे व्यवहारही मोठे होतात. त्यावर काटेकोर लक्ष ठेवावे. गैरप्रकार झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच पैशासह इतर वस्तू जप्त कराव्यात, असे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी तसेच इतर कर्मचाऱयांसाठी योग्य प्रकारे वाहनांचे नियोजन आणि इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबत पारदर्शकता ठेवा, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे सर्व नियम पाळा
कोरोनाचे संकट अजूनही आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्याचा प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार असतील. तेव्हा काटेकोरपणे कोरोनाचे नियम पाळतच निर्विघ्नपणे आणि पारदर्शकपणे निवडणूक पार पाडण्याची सूचना त्यांनी केली.
या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी हे उपस्थित होते. त्यांनीही अधिकाऱयांना यावेळी मार्गदर्शन केले.