डिसेंबर अखेरीस तारखा घोषित होण्याची शक्यता : मतदारांचे प्रमाण मुरगावात घटले,महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ
प्रतिनिधी /पणजी
गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा डिसेंबर अखेर जाहीर होतील. दरम्यान, निवडणूक अधिकाऱयांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु होईल. सध्या मतदारयादींची उजळणी सुरु झालेली आहे. 1 नोव्हेंबर रोजी यादी निश्चित करुन जनतेसाठी खुली ठेवली जाईल. त्यानंतर 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम याद्या जाहीर केल्या जातील. दरम्यान, गेल्या दोन वर्षानंतर मुरगाव तालुक्यातील मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक अधिकारी जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या मुख्य निवडणूक कार्यालय पुन्हा गजबजू लागलेय. 1 नोव्हेंबर रोजी राज्यातील मतदार याद्या तयार करुन त्या जनतेच्या सूचनांसाठी खुल्या ठेवल्या जाणार आहेत.
नव्या मतदारांची नोंदणी सुरु
येत्या 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांना 18 वर्षे पूर्ण होतील, अशा व्यक्तींना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. या अनुषंगाने मतदारांची नोंद केली जात आहे. मागील निवडणुकीपासून आतापर्यंत दगावलेली माणसे वा आपला मतदारसंघ सोडून गेलेली माणसे, गोवा सोडून गेलेल्या व्यक्तींची नावे मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.
अधिकाऱयांवर वाढला कामाचा ताण
मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल तसेच अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत, दोन्ही आयएएस अधिकारी तसेच संयुक्त निवडणूक अधिकारी श्रीमती शेरु शिरोडकर यांच्यावर सध्या कामाचा ताण वाढू लागला आहे.
निवडणूक कार्यालयात वाढला गजबजाट
आल्तिनो येथील मुख्य निवडणूक कार्यालयात पुन्हा गजबजाट वाढू लागलेला आहे. अनेक अधिकारी तसेच निवडणुकीत उतरु पाहाणारी मंडळीही या ठिकाणी मतदारयाद्या वा अन्य काही माहिती मिळविण्यासाठी फेरफटका मारु लागलेली आहेत. राज्यातील मतदार याद्यांच्या उजळणीचे काम सुरु करण्यात आलेले आहे.
उजळणीचे काम 1 नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण
उजळणीचे काम 1 नोव्हेंबर रोजी पूर्ण करुन त्या अनुषंगाने तयार केलेल्या ढोबळ मतदार याद्या जारी केल्या जातील. अंतिम याद्या दि. 5 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित केल्या जाणार असल्याने नोव्हेंबरमध्ये तयार केलेल्या याद्यांमध्ये दुरुस्ती, फेरदुरुस्ती, नावे वगळणे वा नव्या नावांचा समावेश करणे आदी प्रक्रिया या कालावधीत पूर्ण करावयाच्या आहेत.
मतदान केंद्रांची संख्या वाढणार
निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्र हे 1 हजार मतदारांपेक्षा जास्त असू नये. 1 हजार पेक्षाही जास्त मतदार असले तर त्याठिकाणी दोन मतदान केंद्रे स्थापन केली जातील. मागील निवडणुकीच्या तुलनेत किमान 100 पेक्षाही जास्त संख्येने मतदान केंद्रांमध्ये वाढ होईल असा अंदाज आहे. उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात जादा मतदान केंद्रांची स्थापना होईल. त्यासाठी दोन्ही जिल्हाधिकाऱयांकडून पुढील महिन्यात अहवाल आल्यानंतर राज्य निवडणूक अधिकारी त्यावर निर्णय घेतील.
तुलनात्मक मतदारांची संख्या घटतेय?
मागील म्हणजेच इ. स. 2017 मध्ये गोव्यातील मतदारांची संख्या 11,10,866 एवढी होती. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील मतदारांची संख्या इ. स. 2019 मध्ये 11,35,811 एवढी होती आणि सध्या 1 जानेवारी 2021 मध्ये नोंदणी झाल्यानुसार मतदारांची संख्या 11 लाख 44 हजार 987 एवढी झाली आहे. 2019 नंतर मतदारांच्या संख्येत गेल्या दोन वर्षात केवळ 9 हजारांनी वाढ झाली आहे. 2019 मध्ये 11 लाख 35 हजार 811 मतदार होते. सध्या 11 लाख 44 हजार 987 मतदार झालेले आहेत.
मुरगावात मतदारांच्या संख्येत घट
आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात मुरगाव तालुक्यातील मतदारांच्या संख्येत 1 हजार 82 मतदांनी घट झालेली आहे. 2019 मध्ये मुरगाव तालुक्यातील 4 मतदारसंघात एकूण मतदार 1 लाख 99 हजार 85 एवढे होते तर सध्या एकूण मतदारांची नोंद 1 लाख 8 हजार 903 एवढी झालेली आहे. मुरगाव, वास्को, दाबोळी या तीन मतदारसंघात मतदारांचे प्रमाण घटलेले आहे तर कुठ्ठाळीमध्ये नाममात्र 70 मतदार वाढलेले आहेत.
गेल्या 5 वर्षात राज्यातील मतदारांच्या संख्येत केवळ 33,821 नी वाढ झालेली आहे आणि पुरुषांपेक्षा महिला मतदारांच्या संख्येत ही बऱयापैकी वाढ झालेली दिसून येते. 2017 च्या निवडणुकीत एकूण पुरुष मतदार 5,46,734 तर महिला मतदार 5,64,132 एवढे होते. जवळपास 27 हजार महिला मतदार पुरुषांच्या तुलनेत संख्येने जादा होत्या. 2021 मध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 58,758 एवढी आहे तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 86,043 एवढी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 28 हजारांनी जास्त आहे. प्रमाण मागील निवडणुकी एवढेच जरी असले तरी देखील महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत वाढत आहे.