वृत्तसंस्था/ मुंबई
निस्सान मोटर इंडियाने आपल्या चेन्नईतील कारखान्यातील कार्सच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याचे ठरवले आहे. मॅग्नाइट या गाडीच्या मागणीत झालेली वाढ पाहून सदरील कारखान्यातील उत्पादन वाढवण्यावर आता भर दिला जाणार आहे.
येणाऱया जुलैपर्यंत चेन्नईच्या कारखान्यातील कार्सचे उत्पादन महिन्याला 3 हजार 500 पर्यंत वाढवले जाणार आहे. कंपनीच्या नव्या सुव्ह गटातील मॅग्नाइट या गाडीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. 50 हजार जणांनी ही गाडी बुक केली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. आताची आणि भविष्यातील मागणीची दखल घेत कंपनीने कारखान्यातील उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान निस्सान मोटर इंडियाने 2020-21 च्या वर्षात एकूण कार विक्रीत 6 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. 18 हजार 886 कार्स 2020-21 मध्ये खपल्या गेल्या तर याआधीच्या आर्थिक वर्षात 17 हजार 831 गाडय़ा विक्री करण्यात आल्या होत्या. कार उत्पादनाचे उद्दिष्ट आता कंपनीला साध्य करायचं असलं तरी सध्या कोरोनाची पुन्हा आलेली लाट खेळ बिघडवते की काय असं कंपनीला वाटू लागलं आहे. सेमी कंडक्टरचा पुरवठा अद्यापही सुरळीत झाला नसल्याने त्याचा परिणाम कार उत्पादनावर होताना दिसतो आहे.