वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘नीट’ 12 सप्टेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी जाहीर केले होते. तर मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी एमडी, एमएस किंवा पदव्युत्तर पदविका म्हणजेच पीजी डिप्लोमा अशा अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा 11 सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. देशात कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व स्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षांचे भवितव्य अधांतरी झालेले असताना आरोग्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात आहे.
13 जुलै म्हणजेच मंगळवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून नीट युजीचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. दरम्यान ऑफलाईन होणाऱया या परीक्षा नेमक्या कशाप्रकारे घेतल्या जाणार, त्यांचे स्वरुप काय असेल यासंबंधी लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नीट’ देशातील 3 हजार 842 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.