भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडेंचे स्पष्टीकरण
पणजी / प्रतिनिधी
राज्यातील नेतृत्वात बदल करून नवे नेते म्हणून माविन गुदींन्हो यांची निवड केली जाईल अशा आशयाचे सोशल मीडियावर एक वृत्त जारी केल्याने एकच खळबळ माजवून दिली आहे. तथापि, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सदर वृत्त हे बनावट असल्याचे जाहीर केले व त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले.
तथापि, या वृत्तामुळे मात्र बरीच करमणूक झाली आणि त्याचबरोबर प्रत्येकजण एकमेकाला फोन व वेगवेगळय़ा माध्यमातून या बातमीबद्दल सत्यासत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत होते. सदर वृत्त हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले मात्र हे ज्यांनी कुणी केलेले असेल त्यांनी सहज एक पुडी सोडून बघितले आणि त्यातूनच भाजपमध्ये देखील विविध पातळीवर चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे हे वृत्त सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जारी करण्यात आले त्याच वेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ऑनलाइनद्वारे चर्चा करीत होते.