विरोधी पक्षाच्या आमदारावर आरोप
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमधील राजकीय संकटादरम्यान विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसच्या एका आमदाराने पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नेपाळी काँग्रेसचे नेते नरोत्तम वैद्य या बागमती प्रांतातील आमदाराने पंतप्रधान ओलींच्या अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना ही धमकी दिली आहे.
सत्तेवर राहण्यासाठी आणि स्वतःची खुर्ची टिकविण्यासाठी ओली प्रत्येक पैलूवर तडजोड करत आहेत. ओली यांना आम्ही असेच वागू दिल्यास देश कोलमडून पडणार असल्याचे म्हणत वैद्य यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा उल्लेख केला आहे. जर कुणीच तयार न झाल्यास मीच ही हत्या करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदाराच्या धमकीनंतर नेपाळमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. आमदाराच्या विधानावर त्यांचाच पक्ष नेपाळी काँग्रेसने टीका केली आहे. तर ओली यांच्या सीपीएन (युएमएल) या पक्षाने आमदारावर कारवाईची मागणी केली आहे.
नेपाळी काँग्रेसचे प्रवक्ते बिशोप्रकाश शर्मा यांनी वैद्य यांना स्वतःचे विधान मागे घेण्यास सांगितले आहे. कुणीच स्वतःच विवेक गमावू नये. विवेकहीन असताना केलेली विधाने मागे घेतली जावीत. पक्ष अशाप्रकारच्या विधानांवर सारवासारव करण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
ओली यांनी देशात राजकीय संकट सुरू असताना गुरुवारी एका आठवडय़ात दुसऱयांदा स्वतःच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यावर ओली काळजीवाहू सरकार चालवत आहे. अशा स्थितीत त्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळात 7 कॅबिनेट मंत्री आणि एका राज्यमंत्र्यांची भर केली आहे. ओली यांनी यांतर्गत 3 उपपंतप्रधान नियुक्त केले असून यातील दोन जण मधेशी समुदायाशी संबंधित आहेत.