काठमांडू : नेपाळमधील प्रभाव गमाविण्याच्या भीतीने चिनी राजदूत हाओ यांकी यांनी आता पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे विरोधक पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न चालविले आहेत. चिनी राजदूताने नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतल्यावर गुरुवारी प्रचंड यांच्याशी संवाद साधला आहे. नेपाळचा सत्तारुढ कम्युनिस्ट पक्ष दोन गटात विभागला गेला असताना चिनी राजदूताने ही भेट घेतली आहे.
सुमारे 30 मिनिटांपर्यंत चाललेल्या या भेटीदरम्यान प्रचंड आणि चिनी राजदूताने सद्य राजकीय स्थितीवर चर्चा केली आहे. या बैठकीत द्विपक्षीय चिंतेच्या मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचा दावा प्रचंड यांचे सहकारी विष्णू रिजल यांनी केला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी मध्यावधी निवडणूक देशावर लादल्याने चीनच्या जबर झटका बसला आहे. ओली यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीन भारताला लक्ष्य करत होता.