राजेशाही पुन्हा स्थापन करण्याची मागणी : हिंदू राष्ट्र घोषित करा
वृत्तसंस्था/ विराटनगर
नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा बहाल करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. लोकशाहीच्या स्थापनेपासूनच राजकीय दृष्टय़ा अस्थिर राहिलेल्या नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासह राजेशाहीच्या मागणीसाठी काठमांडू समवेत पर्वतीय तसेच तराई क्षेत्रातील अन्य शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत.
राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या नेतृत्वाखाली इटहरीपासून विराटनगरपर्यंत तरुण-तरुणींनी गुरुवारी राजेशाही तसेच हिंदूराष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी निदर्शने केले आहेत. लोकशाहीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत. काठमांडूसह पोखरा, बुटवल, इटहरी, धरान, भैरहवा, विराटनगर, बीरगंजमध्ये राजेशाहीकरता निदर्शने सुरू आहेत. नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची स्थापना करणाऱया पृथ्वी नारायण शाह यांच्या छायाचित्रासह लोक रस्त्यांवर उतरले आहेत. निदर्शक राजकीय पक्ष तसेच नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.
निदर्शकांकडून नुक्कड सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील वक्त्यांनी नेपाळमधील राजेशाहीची आवश्यकता मांडली आहे. राजेशाही आल्यावरच देशाचं भलं होणार असल्याचे म्हटले गेले. हिंदू राष्ट्र पुन्हा स्थापन करण्यासाठी ग्रामीण स्तरापर्यंत संघर्ष केला जाणार असल्याचे बोलले गेले. दोन वर्षांपूर्वी नेपाळच्या दोन युवकांना बुटवल येथे राजेशाहीच्या काळातील राष्ट्रगीत म्हटल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासूनच राजेशाहीसह हिंदू राष्ट्राच्या मागणीला जोर मिळू लागला आहे.