प्रतिनिधी / कोल्हापूर
नोंदणीकृत बांधकाम कामगारांची एजंटविना सरकारकडून ऑनलाईन नावनोंदणी करून, त्यांना ऑनलाईन ओळखपत्र द्यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य लोहार, छोटी आरायंत्रे, फर्निचर उद्योजक संघाच्या वतीने बांधकाम कामगार सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. हे निवेदन सहाय्यक बांधकाम कार्यालय कामगार अधिकारी वाय. एम. हुंबे यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि ओळखपत्र मिळावे म्हणून नोंदणी करण्यासाठी कोल्हापुरला यावे लागते. यामध्ये किमान पंधरा दिवसाचा कालावधी आणि पैसाही खर्च करावा लागतो. त्यामुळे बांधकाम कामगारांची एजंटविना सरकारकडून ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र द्यावे. 2 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यावर 25 हजार रूपये दिवाळी बोनस जमा करावा. लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारकडून देण्यात आलेले 1500 रूपये काही कामगारांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. ते त्वरित संबंधित बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा करावे. बांधकाम कामगारांना घरकुल योजना तत्काळ चालू करावी.
घरकुल योजनेची अंमलबजावणी करून घरकुलसाठी सहाय्य निधी देण्यात यावा. जुन्या आराखडÎाप्रमाणे विविध अनुदान योजना आहे त्यांची सहाय्य निधी रक्कम कमी आहे. वाढत्या महागाईमुळे सहाय्य निधी रक्कम दुप्पट करावी. यावेळी संघाचे अध्यक्ष आनंदा सुतार, अक्षय धुमाळ, प्रविण सुतार, बळीराम सुतार, ज्ञानेश्वर सुतार, संजय पोवार, सुनील चव्हाण, अप्पाजी जाधव आदी उपस्थित होते.