इथियोपियाचे पंतप्रधान सांभाळणार युद्धावरील आघाडी
वृत्तसंस्था/ अदिस अबाबा
इथियोपियामध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे स्थिती अत्यंत खराब झाली असून सशस्त्र बंडखोर राजधानी अदिस अबाबाच्या दिशेने सरकू लागले आहेत. हे महासंकट पाहता इथियोपियाचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते पंतप्रधान अबिय अहमद यांनी आता स्वतःच युद्धात उतरण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान अबिय यांनी मंगळवारपासून युद्धक्षेत्रात देशाच्या सैन्याचे नेतृत्व हाती घेतले आहे. अबिय यापूर्वी सैनिक राहिले आहेत.
उठून उभे रहा आणि इतिहासात स्वतःचे नाव नोंदवा असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले आहे. देशात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारोंच्या संख्येत लोक मारले गेले आहेत. हे युद्ध इथियोपियाचे सैन्य आणि देशाच्या उत्तरेकडील टिग्रे भागात सक्रीय सशस्त्र गटांदरम्यान कित्येक महिन्यांपासून सुरू आहे.
आफ्रिकेतील दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या असलेला हा देश क्षेत्रातील अन्य देशांना अस्थिर करू शकतो असा इशारा अमेरिकेने दिला आहे. टिग्रे पीपल्स लिबरेशन प्रंट हा सशस्त्र गट राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या गटाने राजधानीपासून 220 किलोमीटर अंतरावरील शेवा रोबिट भागावर कब्जा केला आहे. इथियोपियाला पाश्चिमात्य देश पराभूत करू इच्छित आहेत असा आरोप पंतप्रधान अबिय यांनी केला आहे. तर आफ्रिकन महासंघ आणि अमेरिकेचे राजदूत दोन्ही बाजूंदरम्यान शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते.