वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधांच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकण्यात आले आहे. अमेरिकेकडून ‘मल्टी रोल हेलिकॉप्टर्स (एमआरएच) भारतीय नौदलाला प्राप्त झाली आहेत. हे हेलिकॉप्टर सर्व ऋतूंमध्ये काम करण्याच क्षमता बाळगून आहे.
सॅन दिएगोच्या नॉर्थ आयलँड येथील वायुतळावर आयोजित एका सोहळय़ात अमेरिकेच्या नौदलाने अधिकृतपणे भारताच्या नौदलाला दोन एमएच-60आर हेलिकॉप्टर्स सोपविली आहेत. या सोहळय़ात अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत संधू उपस्थित होते. भारताच्या नौदलाने लॉकहीड मार्टिन या कंपनीकडून निर्मिती 24 हेलिकॉप्टर्ससाठी अमेरिकेसोबत 2.4 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे.
भारत-अमेरिका द्विपक्षीय संरक्षण संबंधांचा हा महत्त्वाचा पल्ला आहे. भारत-अमेरिकेची मैत्री गगनाला भिडत असल्याचे संधू यांनी ट्विट करत म्हटले आहे. मागील काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण व्यापार 20 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक झाला आहे. संरक्षण क्षेत्रासह भारत आणि अमेरिका आता डिफेन्स प्लॅटफॉर्म्सच्या उत्पादनापासून विकासात एकत्रित काम करत आहेत.
संरक्षण क्षेत्रात भारताकडून होत असलेल्या सुधारणांमुळे विदेशी गुंतवणूकदारांसाठी मार्ग प्रशस्त झाला आहे. एमएच-60आर हेलिकॉप्टर सर्व ऋतूंमध्ये काम करू शकते. हे हेलिकॉप्टर अत्याधुनिक उपकरणांनी युक्त आहे. अमेरिकेत भारतीय नौसैनिकांच्या पहिल्या तुकडीला सध्या प्रशिक्षण दिले जात आहे.