प्रतिनिधी/ कराड
कराड तालुक्यातील डोंगराळ भागासह शेतीक्षेत्रात बिबटय़ाचा वावर कायम असून मंगळवारी साजूर येथे बिबटय़ाचा शेतात तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. कराडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन केल्यानंतर क्रोनिक निमोनियाने बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसा अहवाल वनविभाग कार्यालयाकडे आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, साजूर येथील शेतकरी अनिल चव्हाण यांच्या शेतात मंगळवारी सकाळी जनावरांसाठी चारा काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी ऊसाच्या सरीमध्ये प्राणी असल्याचा आवाज आला. चारा काढणारांनी जाऊन पाहिले असता तिथे बिबटया तडफडत असताना दिसला. बिबटय़ाला पाहताच शेतमालक ओरडत तेथून बाजूला गेले. हा प्रकार समजताच गावातील लोक हातात काठय़ा घेऊन शेताकडे आले. मात्र बिबटय़ा जागेवरच पडून असल्याचे त्यांनी पाहिले. बिबटय़ा तडफडत असल्याचे लक्षात येताच गावकऱयांनी प्राणी मित्रांना फोन करून घटनेची माहिती दिली. प्राणीमित्र रोहित कुलकर्णी, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांना माहिती मिळाली. ते साजूरच्या दिशेने रवाना झाले. तसेच शासकीय वाहनात पिंजरा चढवून वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक राठोड घटनास्थळाकडे गेले. तोपर्यंत प्राणीमित्र व गमेवाडीचे वनमजूर मयुर जाधव, रोहित कुलकर्णी यांनी बिबटय़ाची पाहणी सुरू केली होती. तेव्हा सुद्धा बिबटय़ा जागेवरच तडफडत होता. वनअधिकारी व रोहन भाटे आले. त्यांनी तपासले असता बिबटय़ा मृत झाला होता. शरीराचे तापमान जास्त होते. मृत बिबटय़ास कराडच्या पशुधन विकास विभाग यांच्या दवाखान्यात आणले. तिथे त्याचे शवविच्छेदन केले. बिबटय़ाच्या प्प्फु्फुसास जवळजवळ 80 टक्के संसर्ग झाल्याने क्रोनिक न्युमोनियाने बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कराड वनकार्यालयात दहन करण्यात आले. या कार्यवाहीत साहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल ए. पी. सवाखंडे, बाबुराव कदम, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक राठोड, वनरक्षक तांबवे मंगेश वंजारे यांनी सहभाग घेतला.
बिबटय़ा 2 वर्षांचा मृत बिबटय़ा नर असून दोन वर्षांचा होता. शवविच्छेदनात त्याने शेळी खाल्ल्याचे दिसून आले. साजूर परिसरात काही दिवसांपूर्वी झाडावर बिबटय़ाचे दर्शन झाले होते. या परिसरात बिबटय़ाची जोडी फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.