ऑनलाईन टीम / बलिया :
उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बलियामधील फेफना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
रतन कुमार सिंह (वय 42) असे हत्या झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी एका मुलाने रतन सिंह यांना बोलावून घेतले. तिथे अरविंद सिंह आणि दिनेश सिंह यांच्या कुटुंबियांनी जमिनीच्या वादातून रतन सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असून, हत्येचा पत्रकारितेशी संबंध नाही, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.