25 हजार सरकारी नोकऱयांना मंजुरी : भगवंत मान सरकारचा पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : 10 मंत्री शपथबद्ध
वृत्तसंस्था / चंदिगढ
पंजाबमध्ये भगवंत मान सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याबाबत मोठा निर्णय घेतला. मान सरकारने पंजाबमध्ये 25 हजार सरकारी नोकऱयांना शनिवारी मंजुरी दिली. पदवीच्या आधारे सर्व नोकऱया दिल्या जातील. यामध्ये कोणतीही शिफारस किंवा लाच चालणार नाही. त्याची जाहिरात आणि अधिसूचना एका महिन्यात जारी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले.
पंजाबमध्ये शनिवारी आणखी दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळय़ानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली असून त्यात सरकारी नोकरभरतीचा पहिला निर्णय जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीत आम्ही पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत बेरोजगारी दूर करण्यासाठी हिरव्या पेनचा वापर करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार नोकरभरतीच्या निर्णयाने आमच्या कामाला सुरुवात होत असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले. राज्यातील तरुण नोकरीसाठी अन्य राज्यांमध्ये धाव घेत असल्याने सरकारने या निर्णयाला प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्याच बैठकीत आमचे आश्वासन पूर्ण करत 25 हजार सरकारी नोकऱयांचा अजेंडा मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पंजाब पोलिसांच्या विविध पदांवर 10 हजार भरती होणार आहे. 15 हजार इतर विभाग, मंडळे आणि महामंडळात भरती होणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
9 करोडपती, 2 मंत्री लखपती
10 नवीन मंत्र्यांपैकी 2 लखपती आहेत. तर उर्वरित 9 जण कोटय़धीश आहेत. लालचंद कटारुचक यांच्याकडे 6 लाख आणि गुरमीत सिंग मीत हेअर यांची 44 लाखांची संपत्ती आहे. सरकारच्या मंत्र्यांची एकूण संपत्ती 72 कोटी आहे. त्याचवेळी चन्नी सरकारमधील मंत्र्यांची एकूण संपत्ती 348 कोटी होती. चन्नी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राणा गुरजीत यांची एकटय़ाची संपत्ती 170 कोटींची होती. या दृष्टिकोनातून ‘आप’च्या नवीन मंत्र्यांची एकूण संपत्ती निम्मीही नाही.
मंत्रिमंडळात 4 जाट शीख, 3 हिंदू आणि 4 दलित चेहरे
पंजाबमध्ये शनिवारी भगवंत मान सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यानुसार 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. सर्वप्रथम हरपाल चीमा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर डॉ. बलजीत कौर, हरभजन सिंग ईटीओ, डॉ. विजय सिंगला, लालचंद कटारुचक, गुरमीत सिंग मीत हरे, कुलदीप धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्मशंकर झिम्पा आणि शेवटी हरजोत बैन्स आदींना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात
आली. पंजाब सरकारमध्ये आता मान यांच्यासह 4 जाट शीख, 3 हिंदू आणि 4 दलित चेहऱयांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये महिला मंत्री डॉ. बलजीत कौर यांचा समावेश आहे. तसेच 8 मंत्री पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. नव्या मंत्रिमंडळात 31 वषीय हरजोत बैंस हे सर्वात तरुण मंत्री ठरले आहेत. बैंस हे अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले जातात. शपथ घेतल्यानंतर आता सर्वांच्या नजरा खातेवाटपाकडे लागल्या आहेत.