ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही चालूच आहे. त्यातच कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला उद्या (26 मे) सहा महिने पूर्ण होत आहेत. याच दरम्यान, मंगळवारी माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील नाराज काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनला जाहीरपणे पुन्हा एकदा आपला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत सिद्धू यांनी पटियाला आणि अमृतसरतच्या आपल्या घराच्या छतावर काळा झेंडा फडकावला आहे.
संपूर्ण पंजाब तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात लढत आहे. हे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न संपुष्टात आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या कायद्यामुळे छोटे व्यापारी आणि मजुरांच्या पोटावर लाथ मारण्याचा डाव आहे. या कायद्यांविरोधात पंजाबचा संघर्ष सुरूच राहील, असे नवज्योत सिंह सिद्धू यांनी म्हटले आहे.
काळे कायदे धुडकावण्याची निशाणी म्हणून हा काळा झेंडा मी माझ्या घरावर लावला आहे, असे सिद्धू यांनी स्पष्ट केले आहे. यंत्रणेला बदलल्याशिवाय शांत बसणार नाही, असा दावाही सिद्धू यांनी यावेळी केला.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी सहा महिने पूर्ण होत असताना हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्याचे आवाहन शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या संख्येने पंजाबचे शेतकरी दिल्ली सीमेकडे कूच करत असल्याचा दावा, भारतीय शेतकरी संघटनेकडून (BKU) करण्यात आला आहे.