ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अनेक दिग्गजांनी महेंद्र सिंह धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच आता पंतप्रधान मोदी यांनी धोनीला एक भावुक पत्र लिहिले आहे. या पत्रात मोदींनी धोनीने क्रिकेट मध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. तसेच मोदींनी या पत्रात धोनीने देशातील जनतेवरही ठसा उमटवल्याचे अधोरेखीत केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या पत्रात धोनीच्या व्यक्तीमत्त्वाचे पैलू, त्याचे त्याची मुलगी जीवासोबत असलेल्या नात्याबाबतही लिहिले आहे. त्याचबरोबर मोदींनीही आशा व्यक्त केली आहे की, आता धोनी आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकले. पंतप्रधानांनी सशस्त्र दलांवर असलेल्या धोनीच्या प्रेमाबाबतही पत्रात नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पत्रात लिहिलं आहे की, ‘धोनीकडून कौटुंबिक आणि व्यावहारिक आयुष्यात संतुलन राखण्याची पद्धत शिकणे गरजेचे आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीच्या जीवनातील प्रेरणादायी क्षणांचा पत्रात उल्लेख केला आहे.
धोनीकडून आपल्या सर्वांना शिकवण मिळते की, कधीही आशा गमावू नका आणि शांत रहा, असा संदेश पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येकासाठी आणि विशेषतः तरुणांसाठी या पत्रातून दिला आहे.
- धोनीने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
या शुभेच्छांसाठी महेंद्रसिंह धोनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. धोनीने म्हटले आहे की, एक कलाकार, एक सैनिक आणि एक खेळाडू यांना प्रशंसेची भूक असते. त्यांची मेहनत आणि त्यागाची प्रत्येकाने दखल घ्यावी, असे त्यांना वाटत असते. तुम्ही केलेली प्रशंसा आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे, असे धोनीने सांगितले.