राज्याच्या हिरकमहोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रमात होणार सहभागी
प्रतिनिधी/ पणजी
गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी गोव्यात दाखल होत आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने विविध प्रकल्पांची उद्घाटने, स्वातंत्र्यसैनिक आणि ’ऑपरेशन विजय’ मधील योद्धय़ांचा सत्कार, सर्वोत्कृष्ट पंचायत, नगरपालिका, स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना पुरस्कार वितरण, तसेच विशेष स्टँप -पोस्टकार्डचे प्रकाशन आदी कार्यक्रमांचा समावेश असेल.
दुपारी 1.30 वाजता दाबोळी येथील हंसा तळावर पंतप्रधानांचे आगमन होईल. तेथून ते गोवा विद्यापीठ हॅलिपॅडवर उतरतील. दुपारी 2 वाजता ताळगावमार्गे पणजीतील आझाद मैदानावर येऊन हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करतील.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मिरामार येथे जातील. दुपारी 2.30 वाजता राज्यपाल, मुख्यमंत्री, स्थानिक आमदार आदींच्या उपस्थितीत ते मिरामार किनारी होणाऱया नौदल परेड आणि हवाई उड्डाण कवायतींच्या (फ्लाय पास्ट) कार्यक्रमात सहभागी होतील. प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम गोव्यात होत आहे.
त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान मोदी यांची बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर जाहीर सभा होईल. तेथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांचे स्वागत करतील. गोव्याला पोर्तुगीज जोखडातून मुक्त करण्यासाठी योगदान दिलेल्या दिवंगत तसेच हयात स्वातंत्र्यसैनिकांचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. गोवा मुक्तीसंग्रामावर आधारित खास लघुपटही दाखविण्यात येणार आहे.
त्याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, नूतनीकरण केलेला आग्वाद किल्ला, मोपा विमानतळावरील हवाई कौशल्य विकास केंद्र, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, यासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, तसेच विशेष टपाल स्टॅम्प व मेघदूत पोस्ट कार्डचे प्रकाशन करण्यात येईल.
राज्यातील सर्वोत्कृष्ट नगरपालिका म्हणून डिचोली पालिकेची निवड करण्यात
आली असून नगराध्यक्ष कुंदन फळारी पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार आहेत. त्याशिवाय उत्कृष्ट स्वयंपूर्ण मित्र म्हणून ईशा सावंत, विनायक वळवईकर या नागरी सेवेतील दोन वरिष्ठ अधिकाऱयांसह अमर हेबळेकर, दीपक पेडणेकर, प्रसिद्ध नाईक, अरुण पंचवाडकर यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.