नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जून 11 ते 13 या कालावधीत ब्रिटनमध्ये होणाऱया जी-7 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी रविवारी हे निमंत्रण दिले. ही परिषद ब्रिटनमधील कोर्नवॉल परिसरात होणार आहे. कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे.
जॉन्सनही या परिषदेच्या आधी भारताचा दौरा करणार आहेत. मात्र निश्चित वेळ ठरलेली नाही. त्यांनी ब्रिटनमधील कोरोना उद्रेकामुळे गणतंत्र दिनाचे भारताचे आमंत्रण नाकारले होते. तथापि, आणखी काही काळानंतर भारतात येतील, अशी माहिती भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्त कार्यालयाने दिली.
यंदाच्या जी-7 परिषदेत कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी विचार करण्यात येईल. तसेच या परिषदेच्या सदस्य देशांमधील परस्पर आर्थिक संबंधांच्या दृढतेसाठीही प्रयत्न करण्यात येतील. कोरोना लसीकरण, आरोग्य व्यवस्था आदी विषयांवरही चर्चा होईल.
कोरोनाचे संकट असतानाही…
अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन आणि युरोपियन महासंघ यांचे प्रमुख या परिषदेत भाग घेतील. भारत अतिथी देश म्हणून उपस्थित राहणार आहे. कोरोना उद्रेकामुळे गेल्या वर्षीची परिषद रद्द करण्यात आली होती. यंदाही हे संकट आहे. मात्र, परिषद घेतली जाणार आहे., असे स्पष्ट करण्यात आले.