पणजी / प्रतिनिधी
पणजी मनपाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत 4 कोटी 77 लाख 51 हजार 750 रूपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तसेच 88 कोटी 29 लाख 90 हजार 150 रूपये खर्चाचा एकूण अर्थसंकल्प या बैठकीत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पावर 24 फेब्रुवारी रोजी होणाऱया बैठकीत मंजुरी घेतली जाईल, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
आयुक्त संजित रॉड्रिगीझ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यंदा महापालिकेतर्फे घर, व्यापार आदींवरच्या करात दरवाढ केलेली नाही. प्रलंबित असलेले विजेचे 8 कोटी रूपये बील फक्त 2.5 कोटी रूपयात ओटीएसद्वारे निकालात काढून भरण्यात आले. तसेच 2 कोटी 22 लाख रूपये पाण्याचे बील फक्त 22 लाखांवर ओटीएसद्वारे निकालात काढून भरण्यात आले अशी माहिती महापौरांनी दिली.
पुढील महापालिका ही पेपरलॅस व्हावी म्हणून प्रत्येक सदस्यांना आय-पॅड दिले जातील, अशी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ही आयपॅड 5 वर्षांच्या कार्यकाळानंतर नगरसेवकांना महापालिकेला परत करावी लागेल.
विविध माध्यमांतून मिळाला महसूल
सध्याच्या महिन्यातच महापालिकेने घरपटीतून 12 कोटी रूपये वसूल करण्यात यश मिळविले आहे. साईन बोर्डावरून 1.1 कोटी रूपये महापालिकेला मिळाले. तसेच बांधकाम परवान्यासाठी 1.47 कोटी, तर कचरा गोळा करण्यासाठी 2 कोटी 80 लाख रूपयांचा महसुल मिळाला. कंपोस्टसाठी 6 लाख 50 हजार तर लोकांनी विकत घेतलेल्या कचरापेटय़ांवरून 6 लाख 61 हजार रूपये महसुल महापालिकेला मिळाला. गाडय़ा टो करण्यावरून 3 लाख 84 हजार रूपये, मास्क न घालणाऱयांना दिलेल्या दंडावरून 68 हजार रूपये प्राप्त झाले असल्याचे महापौरांनी सांगितले.
कॅसिनोंकडून मनपाला 58 कोटी महसूल
विकासकामांसाठी 6 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना महामारीत देखील महापालिकेची वसुली चांगली असल्याचे महापौरांनी सांगितले. कॅनिसोकडून पुर्वी महापालिकेला 12 कोटी रूपये मिळायचे ते यंदा 58 कोटी रूपये महसूल मिळाला.
व्यापारी परवाना कर माफीचा निर्णय पुढील समितीवर
व्यापाऱयांच्या व्यापारी परवान्यांचा कर 4 महिन्यांसाठी माफ करण्याची 10-12 व्यापाऱयांची मागणी होती त्यावर महापालिकेचा लेखा विभाग अभ्यास करून त्यावर नविन महापालिका समिती निर्णय घेईल, असे महापौरांनी सांगितले. महापालिका बाजार संकुलातील दुकानदारांचे लीव्ह ऍण्ड लीयसन्स होते ते लीज करार करण्याची मागणी व्यापारी कुळ संघटनेने केली असून या संदर्भात महापालिका मंडळाच्या पुढील बैठकीत मंजुरी झाली तर ते सरकारला पाठविण्यात येईल अशी माहिती महापौरांनी दिली.
साईन बोर्डांचा घोळ सुटणार
महापालिका परिसरात फक्त 1688 साईन बोर्डची गरज असून यावर महापालिकेने अभ्यास करून नकाशा तयार केल्याचे आयुक्त रॉड्रीगीझ यांनी सांगितले. बोर्डांचा जो घोळ झाला आहे तो यामुळे ठीक होईल असे आयुक्तांनी सांगितले. कॅसिनोच्या एलईडी जाहिरात फलकांमुळे पणजीला थायलंडचे वातावरण तयार झाले असल्याचे नगरसेवक मिनिन डिप्रुझ म्हणाले. त्यावर महापौरांनी त्या फलकांवरूनच यंदा जास्त महसूल प्राप्त झाल्याचे सांगितले.
पे पार्किंगचे व्यापारीकरण : हळर्णकर
पे पार्किंगचे व्यापारीकरण झाले असून मुळात पे पार्किंग शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी होती, असे नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी सांगितले. तेव्हा मंडळाची मंजुरी न घेताच महापालिकेने तिसऱया टप्प्यातील पे पार्किंग व्यवस्थेसाठी सरकारची मंजुरी घेण्यास पाठविले असून हे थांबविण्याची विनंती त्यांनी केली. त्यावर पुढील नवीन मंडळ निर्णय घेईल, असे महापौरांनी सांगितले. प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर बाजारात होत असून यावर हळर्णकर यांनी उजेड घातला तेव्हा पुन्हा प्लास्टिक वापरावर कारवाईचा इशारा महापौरांनी दिला. 15 वर्षे झाली पणजी महापालिका बाजार संकुलाचा प्रश्न कोणत्याच महापालिका मंडळाला सोडता आलेला नसून ही आमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असल्याचे नगरसेवक वैदही नाईक म्हणाल्या. सांत इनेज येथील स्मशानभूमी व कब्रस्तान दि. 23 किंवा 24 रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती मडकईकर यांनी दिली.