सेन्सेक्समध्ये 412 अंकांची तेजी : निफ्टीही वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराचा मागील तीन सत्रातील घसरणीचा प्रवास अखेर आठवडय़ातील अंतिम दिवशी सावरल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्सने 412 अंकांच्या तेजीसह बंद होण्यात यश मिळवलं आहे. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांनी द्वि मासिक पतधोरण बैठकीमध्ये बँकेने रेपोदर स्थिर ठेवला आहे. या घटनेचे सकारात्मक परिणाम बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले होते.
प्रमुख कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी यांच्या समभागातील लिलावामुळे बाजार मजबूत राहिला. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 412.23 अंकांनी वधारुन 59,447.18 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,784.35 वर बंद झाला आहे.
पतधोरण समितीची बैठक शुक्रवारी समाप्त झाली. अपेक्षेप्रमाणे रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग अकरावेळा रेपोदर 4 टक्के कायम ठेवल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून बाजाराची सावध भूमिका पहावयास मिळाली आहे. यासोबतच चौथ्या तिमाहीचे कंपन्यांचे अहवाल येत्या आठवडय़ापासून बाहेर पडणार असल्याचा परिणामही बाजारात सकारात्मक दिसला.
मुख्य कंपन्यांमध्ये आयटीसी, डॉ.रेड्डीज लॅब, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि एशियन पेन्ट्स लाभात राहिले आहेत. याच्या विरुद्ध बाजूला टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, एनटीपीसी, एचसीएल टेक, सनफार्मा, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय, कंपोजिट, हाँगकाँग आणि जपानचा निक्की हे लाभासह बंद झाले आहेत. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.65 टक्क्यांनी लाभासह 101.2 डॉलर प्रती बॅरेलवर राहिले आहे.