राजा भैयांचा कुंडा मतदारसंघ ः सिंधुजा मिश्रा यांना भाजपची उमेदवारी
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीकरता भाजपने प्रतापगढ जिल्हय़ातील 7 मतदारसंघांपैकी 4 जागांवरील स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत. जिल्हय़ातील प्रतिष्ठेचा ठरलेल्या कुंडा मतदारसंघाचा उमेदवारही भाजपने घोषित केला आहे. भाजपने या मतदारसंघात सिंधुजा मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.
कुंडा मतदारसंघात रघुराज प्रताप सिंह ‘राजा भैया’ यांचा दबदबा असून ते सलग 7 वेळा येथून विजयी होत राहिले आहेत. तर याच मतदारसंघात उमेदवार उभा करणे टाळणाऱया समाजवादी पक्षाने गुलशन यादव यांना तिकीट दिले आहे. यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.
भाजप उमेदवार सिंधुजा मिश्रा या उच्चशिक्षित असून त्यांनी उच्च न्यायालयात वकील म्हणून काम देखील केले आहे. सिंधुजा मिश्रा यांनी 2009 मध्ये सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजा भैया यांच्या निकटवर्तीयाला पराभूत केले होते. त्यानंतर त्या 2014 पर्यंत सहकारी बँकेच्या अध्यक्षा राहिल्या होत्या.
2012 मध्ये त्यांनी विश्वनाथगंज विधानसभा मतदारसंघात बसप उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभव चाखावा लागला होता. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सिंधुजा यांना पुन्हा हार पत्करावी लागली होती. लोकसभा निवडणुकीवेळी सिंधुजा यांनी पती शिवप्रकाश सेनानी यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सिंधुज यांचे पती शिवप्रकाश यांनी 2000 साली समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून राजा भैयांचे नातेवाईक अक्षय प्रताप यांच्याविरोधात विधान परिषदेची निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभवाला तोंड द्यावे लागले होते. 2004 साली सेनानी बसपमध्ये सामील झाले. कुंडा मतदारसंघात त्यांनी राजा भैया यांच्या विरोधात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविली होती.
राजा भैयांकडून पती दोनवेळा पराभूत
राजा भैया यांनी 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत सेनानी यांना मोठय़ा फरकाने पराभूत केले होते. सेनानी यांच्या पत्नी सिंधुजा आता 2022 च्या निवडणुकीत राजा भैया यांच्याविरोधात उभ्या राहणार आहेत. समाजवादी पक्षाने येथे स्वतःचा उमेदवार उभा केल्याने कुंडा मतदारसंघातील निवडणूक यंदा रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.