तुरमुरीतील युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी/ बेळगाव
तुरमुरी, ता. बेळगाव येथील एका युवकाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पत्नीच्या संसर्गातून या युवकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली असून या युवकाला रविवारी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. रुग्ण क्रमांक 6825 या पस्तीस वषीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकातील एकूण बाधितांची संख्या 7 हजारवर तर बेळगाव जिल्हय़ातील बाधितांची संख्या 298 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार तुरमुरी येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली आहे. पत्नीच्या संपर्कातून त्याला कोरोनाची लागण झाली आहे. तुरमुरी येथील प्राथमिक संपर्कातील सहा जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 11 जून रोजी त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती.
रविवारी स्वॅब तपासणी अहवाल उपलब्ध झाला आहे. 35 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविल्यानंतर गावात खबरदारी घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून आलेल्या बहुतेक जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फैलाव होण्याचा धोका नाही.
सदाशिवनगर निर्बंधमुक्त
मुंबईहून सदाशिवनगर येथील माहेरी परतलेल्या एका गर्भवती महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदाशिवनगरला निर्बंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी रविवारी हे निर्बंध हटविले आहेत. यासंबंधी एक स्वतंत्र आदेश जारी करण्यात आला आहे. पूर्वेला पाणीपुरवठा मंडळाचे कार्यालय, पश्चिमेला सदाशिवनगर नववा क्रॉस ओंकार जनरल स्टोअर्सजवळ, उत्तरेला हरिद्रा गणपती मंदिर व दक्षिणेला नंदिनी मिल्क-केजीआयडी ऑफिसपर्यंत निर्बंधित क्षेत्र होते. हे क्षेत्र आता रद्द करण्यात आले आहे.
मरणहोळमधील 24 जणांचे स्वॅब संकलित
क्वारंटाईनमधील चाकरमान्यांचे स्वॅब संकलित करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय कर्मचाऱयांवर दगडफेक करून तलाठी व पीडीओंना मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी मरणहोळ येथे घडली होती. मुंबईहून आलेल्या 24 जणांना प्राथमिक शाळेत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना योद्धय़ांवरील हल्ल्यानंतर स्वॅब तपासणीचा तिढा निर्माण झाला होता. चाकरमान्यांनी स्वॅब देण्यास विरोध केला होता. मात्र, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी आदी अधिकाऱयांनी चाकरमान्यांची मनधरणी करून त्यांचे स्वॅब संकलित केले आहेत. ते प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून सोमवारी अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.