नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांनी शनिवारी वयाच्या 67 व्या वषी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती दुआ यांची कन्या मल्लिका यांनी शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी लोधी येथे अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची पत्नी रेडिओलॉजिस्ट पद्मावती यांचे जूनमध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. त्यापासून त्यांची तब्बेत खालावली होती.
दूरदर्शन, एनडीटीव्ही या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पत्रकारिता करणारे सुरुवातीचे पत्रकार अशी विनोद दुआ यांची ओळख होती. पत्रकारितेमध्ये त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला होता. 1996 मध्ये त्यांना प्रति÷ित रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच भारत सरकारने त्यांना 2008 मध्ये पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले होते.
मल्लिका दुआ यांनी वडिलांच्या निधनाची माहिती देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल केली आहे. आदरणीय, निर्भय आणि असामान्य अशा माझ्या वडिलांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ते अतुलनीय असे जीवन जगले. दिल्लीमधील निर्वासित कॉलनीत ते वाढले. त्यांनी 42 वर्ष पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. ते नेहमीच सत्याच्या सामर्थ्याबाबत बोलत असत, अशा काही आठवणीही मल्लिका यांनी लिहिल्या आहेत.