प्रशासनाचा आंधळा कारभार : विश्वेश्वरय्या चौक ते गांधी चौकपर्यंतच्या क्लब रोडकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत क्लब रोड येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करून भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र काही कामे शिल्लक असतानाच फुटपाथवरील दिवे बसविण्यात आले आहेत. या रस्त्यावरील पथदीप कधीच सुरू नसतात. मात्र या ठिकाणी आता फुटपाथवरील दिवे बसविण्यात येत असल्याने हे दिवे किती दिवस सुरू राहणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
विश्वेश्वरय्या चौक ते गांधी चौकपर्यंतच्या क्लब रोडचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आले होते. त्यावेळी रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजक आणि पथदीप सुविधा उपलब्ध केली होती. येथील पथदीप केवळ एक वर्षभरच सुरू राहिले. त्यानंतर सर्व पथदीप बंद अवस्थेत आहेत. हा रस्ता रहदारीचा असल्याने पथदीप सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र कॅन्टोन्मेंट हद्दीत हा रस्ता येत असल्याने पथदीपांची देखभाल करण्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंटकडे सोपविली आहे. पण कॅन्टोन्मेंटकडून पथदीपांची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने येथील पथदीप बंद आहेत. परिणामी हा रस्ता अंधाराच्या विळख्यात सापडला आहे.
पथदीपांची देखभाल करण्याकडे कानाडोळा केला असतानाच आता फुटपाथवर डेकोरेटिव्ह दिवे बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले. या निधी अंतर्गत दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. रस्त्याशेजारी फुटपाथचा पत्ता नाही. बरीचशी कामे अर्धवट स्थितीत आहेत. मात्र फुटपाथशेजारी दिव्यांची उभारणी युद्धपातळीवर करण्यात आली आहे. येथील पथदीप सुरू नसतात. मात्र फुटपाथवर दिवे बसविण्याचा उपयोग काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. प्रथम पथदीप व्यवस्थित सुरू ठेवावेत, त्यानंतरच नवनवीन विकासकामे राबविण्यासाठी निधी खर्ची घालावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.