प्रतिनिधी /फोंडा
फोंडा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व प. पू. पद्माकर महाराज संप्रदायाचे विश्वस्त गोविंद व्यंकटेश नायक खंवटे (86 वर्षे) यांचे सोमवार 3 रोजी निधन झाले. सायंकाळी फोंडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोविंद खंवटे हे प. पू. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज व त्यांचे शिष्य प. पू. पद्माकर महाराज यांचे अनुयायी होते. दत्त संप्रदायात आध्यात्मिक अनुग्रह झाल्याने गेली अनेक वर्षे त्यांनी या कार्यात स्वतःला वाहवून घेतले होते. फोंडा येथील पद्माकर महाराज ट्रस्टच्या संस्थापकापैकी ते एक होते. संप्रदायाचा गाणगापूर येथील आश्रम तसेच गावठण खांडेपार येथे आश्रमाच्या उभारणीत खंवटे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. पुणे येथे व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर गोव्यात त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरु केला. फोंडय़ात काही प्रकल्पही त्यांनी उभारले. नंतरच्या काळात मात्र त्यांनी संप्रदायाच्या कार्यात पूर्णवेळ स्वतःला गुंतवून घेतले. गाणगापूर व खांडेपार येथील प्रशस्त आश्रमाबरोबरच औंदुंबर महाराष्ट्र येथे सिद्धीविनायक मंदिर उभारणीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पद्माकर महाराज व पू. पद्माली विहिनी यांचे 2003 मध्ये निर्वाण झाल्यानंतर शिष्यगुरु सुब्राय खांडेपारकर यांच्या मार्गदर्शनाखाली संप्रदायाचे कार्य पुढे नेण्यात ते सक्रीय होते. त्यांच्या पश्चात पुत्र मयुरेश, हरिष, स्नुषा बीना, दर्शन, नातवंडे डॉ. अनुश्री प्रज्योत खंवटे काणकोणकर, सोहा असा परिवार आहे.